
सिग्नल शाळा नव्या युगाचे पसायदान
सिग्नल शाळेची गरज का भासली ?
जगाच्या प्रारंभापासून तर अंतापर्यंत, एक गोष्ट निरंतर होत राहणार आहे, ती म्हणजे स्थलांतरण. अश्मयुगापासुन ते सायबर युगापर्यंत आणि भविष्यात जे काही युग अवतरणार आहे त्यात एकच समान धागा असणार आहे तो स्थलांतरण. जगभरातील सर्व विकसित देश हे स्थलांतरितांच्या कतृत्वाने मोठी झालीत. स्थलांतरणाने सर्वसमावेशक विकासासोबत काही जटील प्रश्नही निर्माण केले. मुख्य प्रवाहात येऊ न शकलेल्या स्थलांतरीतांच्या प्रश्नांना शिक्षणाच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम सिग्नल शाळा करीत आहे. शाळेपर्यंत मुले पोहचत नसतील तर मुलांपर्यंत शाळा पोहचवण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे.
सुरवात कशी केली ?
ठाण्यातील तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम २०१६ साली समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू झाला. जवळपास वीस ते बावीस वर्षांपासून सिग्नलवर पुलाखाली विस्तापित आयुष्य जगत असलेल्या स्थलांतरीत कुटूंबातील ७० हुन अधिक मुले शिक्षण व समाज या दोघांच्या मुख्य प्रवाहात आली. बेघर निर्वासित मुलांच्या गरजांनुसार त्यांना स्कुल बस, आंघोळ, तीन वेळेचे जेवण ते थेट संगणक, रोबेटिक, तंत्रशिक्षण, क्रीडा प्रशिक्षण देणारी व मुलांच्या गरजेनुसार लवचिक असलेली शाळा पहिल्यांदाच ठाणे येथे उभी राहिली. समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था भारतातील महाराष्ट्र राज्यात सक्रिय असून मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत सामाजिक कार्य करत आहे.
आता पर्यंत काय काम झाले आहे ?
- शाळेच्या आठ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात ८ मुले दहावी उत्तीर्ण झाली. त्यातील ४ मुले डिप्लोमा इंजिनिअरिंग पर्यंत पोहचली, एक मुलगा पदवीधर होऊन पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण घेत आहे.
- दोन मुले आंतरशालेय राज्य स्तरिय विज्ञान प्रदर्शनात सातवे आले व इस्त्रो भेटीसाठी निवड झाली.
- आंतरराष्ट्रीय रोबेटिक स्पर्धेत प्रतिष्ठेचा जज अॅवार्ड मिळवण्याची कमाल ७ विदयार्थ्यांनी केली.
- स्केटींग, मल्लखांब,खो खो, कब्बडीसह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवले.
- सिग्नल शाळेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित झालेले ६ विदयार्थी आता फॅब्रीकेशनचा स्वतंत्र व्यवसाय करू लागले आहेत.
- एकीकडे मुलांचे शिक्षण मार्गी लागत असतांना बेघर पालकांपैकी जवळपास ८० टक्के पालकांनी पुलाखाली राहणे बंद करून भाडयाच्या घरात अथवा झोपडयांमध्ये राहण्याचा मार्ग निवडला.
- शाळेच्या मदतीने ५ पालक रिक्षाचालक झाले.
- शाळेमुळे बेघर, स्थलांतरीत लाखो मुलांच्या वाटा प्रशस्त झाल्या आहेत.
भविष्यात अजून काय करण्याचे ठरवले आहे ?
महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात शाळेवर व्यापक चर्चा होऊन स्थलांतरीत मुलांच्या शिक्षणासाठीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून शाळेला गौरविण्यात आले आता असे प्रकल्प देशभर उभे करून असंख्य शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुळ धारेत आणण्याच्या कामाकडे आता सिग्नल शाळा झेपावली आहे.

खेळांमध्ये बाजी मारली