पुनःश्च हरि ओम

सफाई सेवक महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला पुर्ननिर्माण हे नाव देतांना हे आव्हान खुप मोठे आहे याची जाणिव समर्थ भारत व्यासपीठाच्या चमुला होती. आपली संस्था काही भंगारवाला नाही किंवा आपण काही पुर्नप्रक्रिया करणारा उदयोग उभारतोय असा हेतु नव्हता. सफाई सेवक महिलांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रवाहाच्या मुख्यधारेत आणणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या प्रकल्पाची पायाभरणी झाली. कचरा व्यवस्थापनाच्या तथाकथीत चौकटी मोडीत या कचऱ्याच्या मागील माणुसपणाचे व्यवस्थापन गेल्या बारा वर्षांत करण्याचा प्रयत्न समर्थ भारत व्यासपीठ करत आहे. हे करीत असतांना याला संस्थागत पातळीपर्यंत मर्यादित न ठेवता त्याला प्रकल्प पुर्ननिर्माण नावाच्या कुटुंबाचे रूप संस्थेने दिले. त्यामुळे या सफाई सेवक महिलांच्या सुख, दुःखात हे कुटुंब खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या घरात गॅस, वीज जोडणी आणतांना आपले घर प्रकाशमान होत आहे असा आनंद या कुटुंबातील एक लाख सदस्यांना झाला. त्यांना बैंकिंगच्या मुख्यधारेत आणतांना, त्यांच्या मासिक आरोग्य तपासण्या घेतांना, त्यांच्या मुलांना सिग्नल शाळेच्या माध्यमातुन शिक्षणाच्या मुख्य धारेत आणतांना, त्यांचा आयुविर्मा उतरवतांना आपण आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असल्याची भावना यामागे होती. यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून तन, मन आणि धनाने प्रकल्प पुर्ननिर्माणमध्ये सहभागी असलेल्या सर्व कुटुंब सदस्यांनी आपापले दृष्य स्वरूपातील योगदान आजपर्यंत दिले आहे.

आपल्या सफाई सेवक महिला नुकत्याच सहलीला गेल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी गळक्या छतावरून ओघळणाऱ्या पाण्याच्या थेंबाऐवजी वॉटरपार्कमधील रिमझिमते तुषार अंगावर झेलले. आयुष्याची उतरंड अनुभवणाऱ्या आया बहिणी पहिल्यांदा घसरगुंडीतही आनंद असतो हे मेहसुस केले. वेदना, दारिद्रय, चिंतांसह अनेक समस्यांचा बुफे ज्यांनी आजपर्यंत पाहिला त्या आता रिसोर्टमधील बुफेचा आस्वाद घेत आयुष्याची चव चाखली. त्यांतील अनेक जणींनी झुकझुक गाडीतील पहिला प्रवास अनुभवत, हरि ओम नगर डम्पींग ते ठाणे रेल्वे स्टेशन हे अंतर पहिल्यांदा कापले आहे. एक किलोमीटरचे हे अंतर कापायला त्यांची एक पिढी खर्ची झाली. त्यांच्यासाठीचे जणु हे पुनःश्च हरि ओम आहे. त्या दिवशी त्या घराबाहेर पडतांना साजश्रुंगार करत बाहेर पडल्या, त्या खोल पाण्यात मनसोक्त डुबकी मारत दैन्याला गाडून टाकण्याचा निर्धार करतील. त्यांच्या सुखाचा इंडेक्स वाढवत खऱ्या अर्थाने पुर्ननिर्माण व्हावे ही समर्थ भारत व्यासपीठ आणि प्रकल्प पुर्ननिर्माणच्या प्रत्येक सदस्यांची इच्छा आहे ती आता हळूहळू फलद्रुप होत आहे.

आनंदाकडे झेपावणारे हे संक्रमण असेच वृंदीगत होत राहो अशी राष्ट्रमातेकडे प्रार्थना.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *