या जगात प्रत्येक मुलाच्या जीवनात शिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु आमच्या जीवनात हे खूप अवघड होतं. घरची परिस्थती बिकट असल्याकारणाने आईवडील मुंबईकडे सतत येत असत. त्यामुळे गावाकडे माझे थोडेफार शिक्षण झाले होते. घराची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी सुद्धा आईबाबांसोबत मुंबईमध्ये येत असे. आपल्या जीवनात शिक्षण नाही असे मानून मी मुंबईमध्येच राहण्याचा विचार केला. तेव्हा मला चांगले समजायला लागले होते की जगात कसे जगायचे आहे. हे सारे लक्षात घेऊन मी मुंबईमध्ये ठाणे येते तीन हात नका या सिग्नलवरील पुलाखाली राहू लागलो. सिंग्ग्रलवर मी सुद्धा वस्तू विकू लागलो आणि आपला खर्च भागवू लागलो.
काही दिवसानंतर सिग्नलवर एक शाळा आली ज्याचे नाव आहे सिग्रल शाळा’ परंतु मजुरीचे काम करत असल्यामुळे मला हे माहित नव्हते की इथे शाळा आहे. इथे शाळा आहे हे माहीत झाल्यानंतर मी या शाळेच्या आजूबाजूला फिरु लागलो. ही शाळा बघून मला माझ्या शाळेची आठवण येऊ लागली. एका दिवशी थोडेसे धाडस करून मी शाळेतल्या सरांना भेटलो त्यांना सांगितले, ‘मला पण शाळा शिकायची आहे. मला प्रवेश द्याल का?’ तेव्हा सर म्हणाले, ‘तुझी इच्छा असेल तर मी तुला प्रवेश देतो.’ ते आमचे सर श्री. भटू सावंत त्यांनी मला सिग्नल शाळेत प्रवेश दिला.
काही दिवस शाळेत गेलो होतो त्यामुळे मला लिहिता वाचता येत होते. सरांनी माझ्या वयानुसार मला आठवीत प्रवेश दिला. आठवीचा अभ्यास एवढा अवघड नव्हता त्यामुळे मला समजण्यास सोपे गेले. मी आठवी पास झालो. यानंतर सरांनी विचार केला. मला म्हणाले की, ‘तू दहावीत बसणार का?, तेव्हा मी सांगितले, ‘हो, मी बसणार दहावीत.’ परंतु जसे वाटत होते तसे नव्हते. नववीचा अभ्यास नसल्याने मला दहावी खूप कठीण जात होती. सुरुवातीचे सहा महिने तर मला काय करायचे आहे, हे सुद्धा कळत नव्हते. तेव्हा मला शिकवण्यासाठी देशमुख मॅडम, करंदीकर मॅडम, जावळे मॅडम, कर्णिक मॅडम, स्वप्ना मॅडम इत्यादी शिक्षिका शिकवण्यासाठी येत होत्या. जावळे मॅडम या गणित विषयात इतक्या माहीर आहेत की त्यांचे हातच गणित सोडवतात. डोके वापरण्याची तर गरजच नाही. शेवटचे दोन अडीच महिने राहिले आणि अभ्यास अजूनही मागेच होता. तेव्हा आमच्या सुमन शेवाळे मॅम यांनी सरांना सांगितले की अभ्यासासाठी मोहन आणि दशरथला माझ्या घरी येऊ द्या. सुमन मॅडम आणि त्यांच्या घरी आम्हांला अभ्यासासाठी बोलावले.
दिवसभरात जेवढा अभ्यास झाला त्याचे रिव्हिजन करुन घेत होत्या. आणि या सर्व शिक्षकांच्या आशीर्वादाने मला दहावीत ७६.८०% गुण मिळाले. आणि मी दहावी पास झालो.
-मोहन काळे